बीड
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असून आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज बीडमध्येही महायुतीचा मेळावा पार पडला.
या मेळाव्यात बीड लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोण असेल, यावर जणू शिक्कामोर्तब करण्यात आला. या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी भाषणं केली. भाजपचे रमेशराव आडसकर आपल्या भाषणात म्हणाले, महायुतीचाच आणि भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे उमेदवार असतील, असं ठणकावुन सांगितलं. याशिवाय अमरसिंह पंडित यांनीदेखील उमेदवार म्हणून डॉ. प्रितम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. विशेष म्हणज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रितम मुंडे याच उमेदवार असतील आणि देशात सर्वाधिक मतांनी विजयी होती, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे बीडमध्ये लोकसभा मतदारसंघातून प्रितम मुंडे निवडणूक लढवतील यावर जणू निश्चिती करण्यात आली.
रविवारच्या बीडमधील मेळाव्यात पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रितम मुंडे, समन्वयक अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, आर.टी.देशमुऱ, भाजपचे रमेशराव आडसकर, शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले आणि शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान, पंकजा मुंडे यंदा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून आग्रह केला जात असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही या मतदारसंघासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं जात होतं.