मुंबई
आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि काँग्रेसला धक्का बसला. तब्बल ५५ वर्षांपासूनचं काँग्रेससोबतच्या नात्याचा असा शेवट झाला. याबद्दल बोलताना मिलिंद देवराही भावुक झाले होते. दरम्यान भाजप मंत्र्यांनी राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची संकेत दिले आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसात आणखी कोण महायुतीचा हात धरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भुकंपाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, फक्त १५ दिवस थांबा, राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
आज राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीचे महामेळावे पार पडले. यावेळी जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या तिन्ही पक्षांचा एकत्रितपणे मेळावा पार पडला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, भाजप मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. यावेळी गिरीष महाजनांनी राजकीय भुकंपाचे संकेत दिले.