मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी १७ मार्च रोजी रात्री मुंबईत पार पडला. या सभेत राहुल गांधीसह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राजाची आत्मा EVM, CBI, ED आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. याच्या मदतीने ते नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये सामील करवून घेत आहेत. काँग्रेस, शिवसेना, NCP-SCP मधील नेते भाजपमध्ये जाण्यामागील कारण काय? ते सर्वजण भाजपला घाबरले आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेता-अभिनेत्रींप्रमाणे नरेंद्र मोदींचा एक मुखवटा आहे. आज नरेंद्र मोदींजवळ भ्रष्टाचाराची मोनोपॉली आहे. आज नरेंद्र मोदींची भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलेक्टोरल बाँड्सची पद्धत सुरू झाली. इथे रस्त्यावरून खंडणी सुरू आहे. कंपनीला कंत्राट मिळते, त्यानंतर ते थेट इलेक्टोरल बाँड्स खरेदी करतात. कंपनी कोणताही नफा कमवत नसून त्यापेक्षा जास्त पैसा भाजपला देत आहे, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.
शिवाजी पार्कमध्ये झालेल्या रॅलीत राहुल गांधीं व्यतिरिक्त तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजद नेता तेजस्वी यादव, शिवसेनेचे (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, आपसह इंडिया आघाडीतील अन्य नेताही सामील झाले होते. यापूर्वी राहुल गांधींनी मुंबईत मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांच्यासह त्यांची बहिण प्रियांका गांधी वाड्रा, अभिनेत्री स्वरा भास्करदेखील उपस्थित होत्या.
नफरत के बाजार मे मोबब्बत की दुकान खोलो..
मी चार हजार किमी पदयात्रा काढली. देशातील विविध भागांमध्ये फिरलो. परंतू कोणीच अग्निवीर योजना चांगली असल्याचं म्हटलं नाही. या पदयात्रेदरम्यान मला लोकांकडून जे प्रेम मिळालं ते मी शब्दात सांगू शकत नाही. जाणून-बुजून देशात द्वेष पसरवला जात आहे. ‘नफरत के बाजार मे मोबब्बत की दुकान खोलो’ , हे गांधींजी, भगवान बुद्ध आणि भगवान रामाने सांगितलं असल्याचं ते म्हणाले.
छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा… – शरद पवार
देशाच्या अवस्थेत बदल करण्याची गरज आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी छोडो भारत, छोडो हुकूमतचा नारा दिला होता. आता याच शहरात छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा देत निर्धार करायला हवा. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी आणि सर्वांना आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाही. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करत नाही, त्यांना दूर केलं पाहिजे. पुढच्या महिन्यात आपल्याला ती संधी मिळाली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
त्याऐवजी संविधान ठेवा – उद्धव ठाकरे
ही लढाई संविधान वाचवायची आहे. बाळासाहेब म्हणायचे याची सुरुवात कोर्टातून करा. कोर्टात जो साक्ष द्यायला येतो. तो धर्मग्रंथावर हात ठेवता. त्याऐवजी संविधान ठेवा. आम्ही विरोधक आहोत. पण हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.