बारामती- अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आता बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी कुटुंबातील लढत लोकसभेसाठी होणार हे जवळपास निश्चित आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना महायुतीचं तिकिट मिळणार आहे. यात पवार कुटुंबातील अनेक जणांनी शरद पवार यांची साथ दिलेली आहे. रोहित पवार यांच्यापाठोपाठ अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हेही सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बाहेर पडल्याचं दिसतंय. यातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजितदादांवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणालेत श्रीनिवास पवार ?
बारामतीतल्या एका छोट्या कार्यक्रमात श्रीनिवास पवार यांनी याबाबत वक्तव्य केलंय. श्रीनिवास पवार म्हणालेत की, माझं असं दादांना म्हणणं होतं की, आमदारकी अजित पवारांकडे आहे. तर खासदारकी तरी आपण साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे आपल्यावर उपकार आहेत, ते गावकरी म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, आमच्यावर साहेबांचे किती उपकार आहेत. साहेबांचं वय ८३ झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला काही पटलेलं नाही. माझे काही मित्र पण म्हणाले की, आता इथून पुढची दादांची वर्ष आहेतं. साहेबांची काय नाहीत. तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. का तर पुढची १० वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे.
पवार विरुद्ध पवार संघर्ष अधिक तीव्र होणार?
निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता अजित पवार यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावानंच केलेल्या या टीकेमुळं चर्चेला तोंड फुटलेलं आहे. पवार कुटुंबीयांत यापूर्वी एक बैठक झाली होती. त्यात खासदारकी शरद पवारांकडे आणि आमदारकी अजित पवारांकडे राहील असा निर्णय झाला होता, असं सांगण्यात येतंय. मात्र अ्जित पवारांनी बारामतीत लोकसभेतही उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मतदारसंघात कार्यक्रमांना हजेरी लावताना आणि जनसंपर्क वाढवताना दिसतायेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या संघर्षात पवार कुटुंब एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही चिन्हं दिसतायेत.
हेही वाचाःनांदेडचे आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली