नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपावर येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यात झालेल्या चर्चेनंतर बुधवारी संध्याकाळी भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत भाजपा उमेदवारांची नावं फायनल झाल्याचं सांगण्यात येतंय. अमित शाहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक आज उद्यात दिल्लीत होणार असून त्यात यादी अंतिम केली जाईल, असं सांगण्यात येतंय.
भाजपा 32 पेक्षा जास्त जागा लढवणार
लोकसभा निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे. 370 हा आकडा गाठवण्यासाठी उ. प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारसारख्या मोठ्या राज्यांतून भाजपाचे जास्त खासदार निवडून येणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपा 32 ते 35 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर एकनान शिंदे शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळतील, असं सांगण्यात येतंय.
भाजपाला जास्त जागा मिळणार असल्यानं शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजीचा सूर आहे. शुक्रवारी याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत जाणार असल्याची माहिती आहे. याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. शाहा, नड्डा यांच्या भेटीत अंतिम निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येतंयं.
सन्मानपूर्व जागा देणार- फडणवीस
दिल्लीत रात्री झालेल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षातील पक्षांचा सन्मान ठेवला जाईल. असं म्हटलंय. या पक्षांना योग्य प्रतिनिधीत्व दिलं जाईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
अमित शाहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय?
मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुंख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमित शाहा यांनी जागांसाठी अट्टाहास नको, असा थेट संदेश दिलाय. ज्या जागा निवडून येण्याची खात्री आहे, त्याच जागा दिल्या जातील हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
२०१९ च्या निवडणुकीत विजय हा एकमेव निकष नसेल, तर यावेळी असलेला उमेदवार, मतदारांमध्ये उमेदवाराबाबत असलेलं मत, सर्व्हेच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
हे सर्व पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपाच राज्यात मोठा भाऊ अ्सेल आणि त्यांनाच सर्वाधिक जागा मिळतील, असं सध्यातरी दिसतंय.
हेही वाचाःउद्धव ठाकरेंचं निष्ठावंत रविंद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर?