नवी दिल्ली- 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत भाजपाचा विस्तार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 2014 नंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेत, पार्टी विथ डिफरन्स या मूल्याला बाजूला ठेवत पक्षाचा विस्तार केला. देशातील सर्व प्रांतात, सर्व जाती-धर्मांत भाजपाचा झालेला शिरकाव आज 10 वर्षांनंतर अनुभवायला मिळतो आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर 30 एप्रिल 2015 पर्यंत 10 कोटी सदस्यत्वाचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. हे लक्ष्य अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले.
21 राज्यांत सत्ता
2014 साली पंतप्रधानपदी मोदी आल्यानंतर गेल्या 10 वर्षांत त्यांची मोठी लाट देशभरात पाहायला मिळतेय. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेच्या समकक्ष लोकप्रियता मिळवण्यात मोदी गेल्या 10 वर्षांत यशस्वी ठरल्याचं सांगण्यात येतंय. 2014 साली मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशात 7 राज्यांत भाजपाची सत्ता होती. ती आता 21 राज्यांपर्यंत जाऊन पोहचलेली आहे. 2015 साली जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याशी हातमिळवणी करत जम्मू-काश्मीरमध्येही भाजपानं पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होण्याचा प्रयोग केला आणि नंतर तो मोडलाही.
ईशान्येकडच्या राज्यात प्रवेश
ईशान्येकडील राज्यांत 2014 सालापर्यंत भाजपाचं अस्तित्व नव्हतं. आता आसाम, मणिपूर, त्रिपुरामध्ये भाजपा पूर्ण बहुमतानं सत्तेत आहेत.मिझोरम, नागालँड आणि सिक्कीममध्ये युतीत भाजपा सत्तेत आहे.
गेल्या 10 वर्षांत मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून देशात महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात नोटाबंदी, जीएसटी, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, काश्मिरातील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय, राम मंदिर उभारणीला प्रोत्साहन, सीएए-एनआरसी सारखे कायदे, तीन तलाकवर बंदी, फौजदारी कायद्यात बदल, समान नागरी कायद्याच्या दिशेनं वाटचाल यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.
हेही वाचाःभाजपाच्या विरोधाचे मुद्दे अजित पवार राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात, काय आहेत संकेत?