मुंबई- पहिल्या टप्प्यात देशात केवळ 63 टक्के मतदान झालंय. हे गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक कमी मतदान आहे. 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्ते आले होते, त्यावेळी 66 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 साली पुन्हा मोदी सत्तेत आले तेव्हा 67.40 टक्के तदान झालं होतं. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान पार पडलंय. यामुळं भाजपा श्रेष्ठी चिंतेत असल्याचं मानण्यात येतंय. त्यामुळेच पुढच्या टप्प्यात आक्रमक प्रचार आणि मतदानात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
प्रत्येक मतदारसंघात 10 टक्के मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न
दुसऱ्या टप्प्यापासून अखेरच्या टप्प्यापर्यंत आता प्रत्येक मतदारसंघात 5 ते 10 टक्के मतदान वाढावं यासाठी आता भाजपानं आग्रह धरलेला आहे. प्रत्येक मतदारसंघात आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. कमी मतदान झालेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडमुकांच्या तोंडावर इशारा देण्यात आलाय. कमी मतदान झालं तर विधानसभा जागावाटपात अडचण येईल, असे स्पष्ट संकेत देण्यात आलेत. मुंबई दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडेंनी मुंबईत महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेत, मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आलेत.
https://twitter.com/TawdeVinod/status/1782716112267886601
प्रचारात आक्रमक मुद्दे
सत्तेत येण्यासाठी देशभरात 66 टक्के मतदान भाजपाला अपेक्षित आहे. मतदान कमी होणं 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपाला परवडणारं नाही. त्यामुळेच आक्रमक मुद्दे आता प्रचारात येताना दिसतायेत. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचे आरोप, राम मंदिराचं आमंत्रण स्वीकारुन केलेला अपमान, मंगळसूत्रांचं वाटप घुसखोरांना करणारं अशी विधानं आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या भाषणाचे महत्त्वाचे विषय ठरु लागलेले आहेत.