X: @therajkaran
आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूरमधून लोकसभा निवडणूक (Solapur Lok Sabha) लढवण्यास इच्छुक आहेत. सोलापूरमधून माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता असून काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल, असे प्रणिती शिंदे यांनी जाहीर केलं आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपने प्रणिती शिंदेंना ऑफर दिली होती. मात्र आम्ही ती ऑफर नाकारली, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रणिती तिच्या विचारांवर ठाम आहे. ती काँग्रेसशी (Congress) प्रामाणिक आहे. गांधी- नेहरूंचे विचार यांसोबत ती राहणार आहे. देशात अशा विचारांच्या कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे. प्रणितीसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. पक्ष सोडून जाणं तिला पटत नाही. आतापर्यंत ज्या जनतेने आपल्याला तीन वेळा निवडून दिलं आहे, त्या जनतेला आणि पक्षाला ती सोडून जाऊ इच्छित नाही. मात्र दुसरीकडे भाजपा तिला आपल्या पक्षात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. सोलापूरच्या जागेसाठी ते प्रयत्न करत आहेत. प्रणितीला आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत खूप प्रयत्न केले. परंतु, प्रणितीने तसा विचारच केला नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर मतदारसंघात भाजपकडे (BJP) तगडा उमेदवार नसल्याने भाजप नेते काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी उत्सूक असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर सुशीलकुमार शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शिंदे म्हणाले, भाजपने प्रणिती शिंदे यांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रणिती तिच्या तत्वांशी, काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक असल्याने तिने भाजपाची ऑफर नाकारली. भाजपच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांनी अनेक वेळा ऑफर दिली. पण प्रणिती यांना हे पटत नाही. ज्या लोकांनी तीन वेळा निवडून दिलं, त्यांना दगा देता येणार नाही, असंही शिंदे म्हणाले.