लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आज शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काल शुक्रवारी, २९ मार्च रोजी डॉ. अर्चना यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतरच अर्चना या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या चर्चेने अधिक जोर घेतला होता. आता प्रवेशाची निश्चित तारीख ठरल्यामुळे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशाला मूर्त रूप येणार आहे .या प्रवेशामुळे लातूर ,धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलतील असे मानले जाते. अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीमुळे अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवराज पाटील चाकुरकर यांच्या सून भाजपत प्रवेश करणार आहेत.
मराठवाड्यात अस्वस्थता…
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. यापूर्वीही शिवराज पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आजच्या परिस्थितीत श्रीमंतांना व गरिबांना काँग्रेस आपल्यापासून दुरावत चालल्याची भावना बळावत चालल्यामुळेच काँग्रेसची आजची स्थिती निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली होती. आधीच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये मराठवाड्याला मोठा धक्का बसला. आता चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशाने लातूर ,धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील काँग्रेसच वर्चस्व संपुष्टात येऊ शकतं.