मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र अद्यापही जागावाटपाचा तिढा संपलेला नाही. जागांवरुन अजूनही महाविकास आणि महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. काल ३० मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरू होती. अद्यापही महायुतीमध्ये काही जागांचा तिढा डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या बैठकीत या तीन जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पहाटे तीन वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरुन निघाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार देण्यासाठी आग्रही आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर उदय सामंत आपल्या भावासाठी आग्रही आहेत. शिवसेनेला ही जागा दिल्यास मोठ्या संख्येने निवडून आणू असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. छत्रपती संभाजीनगरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील इच्छुक आहेत. पण भाजप सुद्धा या जागेसाठी आग्रही असल्याचं सूत्रांकडून समजतंय.