ताज्या बातम्या महाराष्ट्र

पिक्चर अभी बाकी है! शरद पवारांचं कॉलर उडवत उदयनराजेंना आव्हान; मविआमधून हे 4 उमेदवार चर्चेत

सातारा : शरद पवारांची खेळी लक्षात येईपर्यंत बराच काळ लोटून जातो, असं म्हटलं जातं. आता साताऱ्यातून शरद पवारांनी कॉलर उडवत उदयनराजेंनाच आव्हान दिलं आहे. दिल्ली मोहीम फत्ते करुन आलेल्या उदयनराजेंना साताऱ्यातून कमळाच्या चिन्हावर उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा भाजपाला देऊन त्याबदल्यात नाशिकची जागा महायुतीत अजित पवारांना सोडण्यात आली आहे.

दिल्ली दरबारी झालेल्या या निर्णयानंतर साताऱ्यात आलेल्या उदयनराजेंचं हे असं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांनीही आता निर्णय झालेला आहे, विषयच संपला असं सांगत उमेदवारी मिळाल्याचे संकेत दिलेत. विशेष म्हणजे आपल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी त्यांच्या जंगी स्वागताचा उल्लेखहाी केला. काल पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी चर्चा केली आणि त्यात उमेदवारांच्या नावाची चाचपणीही केली आहे.

श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, असा पवारांचा आग्रह होता. मात्र प्रकृतीच्या कारणामुळं श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला. पाटलांच्या नकारानंतर आणखी तीन चे चार नावं चर्चेत असल्याचंही पवारांनी सांगितलंय.

साताऱ्यातून मविआची उमेदवारी कुणाला?
१. शशिकांत शिंदे
२. बाळासाहेब पाटील
३. सुनील माने
४. सत्यजीत पाटणकर

शरद पवारांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता, मात्र राज्याची जबाबदारी असल्यानं ते शक्य नसल्याचं पवारांनी सांगितलंय. येत्या दोन ते तीन दिवसांत साताऱ्याचा उमेदवार निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी कॉलर उडवून, शरद पवारांनी उदयनराजेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल असे संकेत दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातल्या सभेनंतर झालेल्या चमत्काराचा फटका त्यावेळी उदयनराजेंना सहन करावा लागला होता.

आता यावेळी शरद पवार कुणाला संधी देणार आणि प्रचार सभात काय घडणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. दुसरीकडं माढा लोकसभा मतदारसंघातही शरद पवार काय खेळी करणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीतून विरोध होत आहे. अजित पवारांसोबत असलेले रामराजे निंबाळकर, भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उघड उघड विरोधी भूमिका घेतलेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर थेट प्रचाराला सुरुवात केलेली आहे. फडणवीस-अजित पवारांची शिष्टाईही अयशस्वी ठरल्याचं दिसतंय. रामराजेंनी या भेटीनंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत कमी मतं पडली तर आपण जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे.

मोहिते पाटील यांचं घराणं रणजीतसिंहांवर नाराज असल्याचं दिसत आहे. सध्या भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांना भेटले. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते हे तुतारीवर लढणार असल्याचं आधीच जाहीर करून टाकलंय. मात्र मोहिते पाटील यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माढ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांना माढ्यात पाठवण्यात आलंय. तीन लोकसभा आणि आठ ते नऊ विधानसभा मतदारसंघांवर मोहिते पोटील यांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसू शकतो. कोल्हापुरात शाहू छत्रपतींना उमेदवारी देत शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे. त्याचप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी चिन्हावर लढवल्यास माढावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरपाठोपाठ सातारा आणि माढा अशा दोन लोकसभा मतदारसंघांत शरद पवारांनी फासे टाकलेले दिसतायेत. आता भाजपा या खेळीला काय उत्तर देणार, हे पाहावं लागणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात