Twitter: @NalavadeAnant
मुंबई
देशात राहुल गांधींची लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावण प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली असली तरी याद राखा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू’ असा, खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने सोशल मीडियावर रावणाच्या अवतारात दाखवले आहे. यावर काँग्रेसने आज तीव्र प्रतिक्रिया दिली. पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज चेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार काँग्रेस पक्षाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. पण भाजपने अति केले तर त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतील, असाही इशारा पटोले यांनी दिला.

१९४५ मध्ये ‘अग्रणी’ या मराठी वृत्तपत्रात महात्मा गांधींना रावणाच्या प्रतिमेत दाखवून भाजप आणि संघाच्या लोकांनी त्यांची बदनामी केली होती. आता त्याच प्रवृत्तींनी इतिहासाची पुनरावृत्ती करत राहुल गांधी यांना रावणाच्या प्रतिमेत दाखवून त्यांची बदनामी केली आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा देशाच्या रक्षणासाठी गांधीच पुढे येतात. या देशाला गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले आणि राष्ट्र म्हणून उभे केले. रावण प्रवृत्तीच्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यात काडीचाही संबंध नाही. आज राहुल गांधी यांची जनतेत लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ते जनतेचे नायक आहेत म्हणनूच भाजपची खलनायकी प्रवृत्ती त्यांच्याविरोधात सातत्याने कारस्थाने करत आहे, असाही आरोप पटोले यांनी केला.
मुंबई काँग्रेसचे आंदोलन
दरम्यान, राहुल गांधी यांना रावण अवतारात दाखविल्याचा निषेध म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने आज आझाद मैदान येथे निषेध आंदोलन करण्यात आले. आमच्या नेत्यांबद्दल भाजपच्या आयटी सेलकडून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होतो. पण त्यांच्याविरोधात काहीच कारवाई होत नाही. हेच जर आमच्याकडून झाले तर आमच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल होतात. महात्मा गांधी यांची बदनामी करणारे खुलेआम फिरत आहेत. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू यांचे चेहरे रावणाच्या तोंडांवर लावून गोळी मारणारे पोस्टरही याच प्रवृत्तीच्या लोकांनी फडकावले होते, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय निरूपम, माजी आमदार मधू चव्हाण, अशोक जाधव आदी सहभागी झाले होते.