शिलाँग
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी येथे पोहोचली. यावर काँग्रेसला रोखण्यासाठी पोलिसांनी रस्ता अडवला होता. यानंतर संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडल्याचा आरोप केला जात आहे.
या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, अशी वागणूक आसामी संस्कृतीचा भाग नाही. याप्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची सूचना आसाम पोलिसांच्या डीजीपींना करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम पोलिसांनी वर्किंक डेचं कारण देत न्याय यात्रेला शहरातून जाण्यास मनाई केली. न्याय यात्रा आज शहरातून गेल्यास वाहतुकीवर परिणाम होईल, असे पोलिसांनी सांगितले होतं. दरम्यान यावर राहुल गांधी म्हणाले, बजरंग दल आणि जेपी नड्डा यांची रॅली त्याच मार्गावरुन निघाली, ज्या मार्गावर आमचा मोर्चा थांबवण्यात आला आहे. म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅरिकेट्स हटवले. आम्ही कायद्याचं पालन करतो, त्यामुळे ज्या मार्गावरुन जाण्यास आम्हाला परवानगी मिळाली, आम्ही त्याच मार्गाने प्रवास करू.
काँग्रेसने दावा केला आहे की, त्यांना गुवाहाटीमध्ये रोड शो किंवा पदयात्रा करावयाची होती. मात्र सरकारने याची परवानगी दिली नाही. याशिवाय राहुल गांधी गुवाहाटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. मात्र याचीही परवानगी नाकारण्यात आली. शेवटी कॅम्पस परिसरात विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी राहुल गांधींना बोलण्याची विनंती केल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मला विद्यापीठात येऊन तुमच्याशी संवाद साधण्याची इच्छा होती. तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, आणि यासाठी मी काय मदत करू शकतो याबद्दल बोलायचं होतं. मात्र त्याची परवानगी नाकारण्यात आली. महत्त्वाचं हे नाही की इथं राहुल गांधी आला की नाही… महत्त्वाचं हे आहे की, तुम्हाला कोणाचंही म्हणणं ऐकून घेण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. हे केवळ आसाममध्येच घडत नाहीये तर देशातील प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठात घडतंय.