मुंबई : आगामी लोकसभेसाठी रावेर मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे . मात्र त्यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी रोहिणी खडसे यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड मिळून देत आपली निष्ठा सिध्द करण्याचे आवाहन केले होते. यावर रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांची उणीव भासणार मात्र रावेरमध्ये लढेंगे और जीतेंगे, असे म्हटले आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे हे भाजप वाटेवर असल्याने त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. आज ते इकडे नसल्याने सगळ्यात जास्त उणीव मला भासत आहे. कारण ते माझे वडील आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच मी राजकारणात आले आहे, आता लढत आहे, शिकत आहे, लढेंगे और जितेंगे. रक्षा ताई आपल्या परिवारातील असल्या तरी ही लढाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधातील नाही तर विचारांची लढाई आहे. त्यामुळे ही व्यक्तीची नाही पक्षांची लढाई असून आम्ही दोन्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेत काम करत असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. माजी मंत्री सतीश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड मिळून द्यावा आणि निष्ठा सिध्द करावी असे म्हटले. सतीश पाटील यांना आपण उत्तर देण्याची आवश्यकता आहे असे आपल्याला वाटत नाही असेही त्या म्हणाल्या आहेत . कारण त्यांच्या सगळ्या प्रश्नांना पक्षश्रेष्ठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिले आहे. मी पक्षासाठी काम करत आहे. लोक आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत ते पाहता आमच्या उमेदवाराचा विजय नक्की होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान याआधी सतीश पाटील म्हणाले की, आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये नणंद भावजयी अशी लढाई होवू द्या, पण रोहिणी खडसेंनीच नकार दिला. ते जावू द्या पण आता तुम्हाला मुक्ताईनगरची जबाबदारी दिली आहे. तुम्ही आपल्या उमेदवाराला अधिक लीड मुक्ताईनगरमधून मिळवून द्या. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते समजू, असे त्यांनी म्हटले आहे. यावर आता रावेरमध्ये आम्ही जिकणार असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे .मी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे. मी याच पक्षात आहे. भविष्यातही याच पक्षात राहणार आहे असेही त्याची सांगितले .