मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह (Congress) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे(Rashmi Barve ) यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळं आता यानंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रामटेक मतदारसंघात रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीचा मुद्दा हा सर्वाधिक चर्चेत आहे. कारण बर्वेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आला आहे. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. बर्वे यांच्या जातप्रमाणपत्राबाबत सुनिल साळवे(Sunil Salve )नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.जातपडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा हा निर्णय घेतल्यानंतर आता काँग्रेसकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात येतो, यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण या निर्णयानंतर रश्मी बर्वे यांच्याकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार रश्मी बर्वेना नोटीस पाठवण्यात आली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळी राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता जातपडताळणी समितीनेच हा निर्णय दिल्याने रश्मी बर्वे मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत.