मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik LokSabha)उमेदवारीवरून असलेला सस्पेन्स आता आणखीनच वाढत चालला आहे .सध्या या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार, राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे.आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी एन्ट्री घेतली आहे . त्यामुळे आता कळीचा मुद्दा ठरलेल्या या मतदारसंघात उमेदवारीच्या घोषणेला जेवढा विलंब होतोय तेवढाच उमेदवारीवरून तिढा वाढणार का याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे .
नाशिकची जागा शिवसेनेची अशी कार्यकर्त्यांची मागणी असून तेथील जागा भाजपाला (bjp) सुटावी असा प्रचार भाजपकडून सुरू झाला. त्यातच मागील आठ ते दहा दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान गाठत रस्त्यावर ठाण मांडून नाशिकची जागा शिवसेनेला सोडावी आणि हेमंत गोडसे यांना पुन्हा उमदेवारी देण्याची मागणी केली. त्यानंतर या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे म्हणून भाजपचे चार आमदार, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सागर बंगला गाठला. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी. सलग दोन टर्म भाजपच्या पाठिंब्याने गोडसे निवडून आलेत, असा दावा त्यांनी केला .मात्र गोडसेंच्या यांच्या कार्यपद्धतीवर फडणवीस यांच्याकडन नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, समीर भुजबळ यांनी 2009 च्या निवडणुकीत मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. समीर भुजबळ यांना 2 लाख 38 हजार 706 मते मिळाली तर हेमंत गोडसे यांना 2 लाख 16 हजार 674 मते मिळाली. एकूण मतदानाच्या 16 टक्के मते समीर भुजबळ यांना तर १४ टक्के मते हेमंत गोडसेंना मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड यांनी कसाबसा दीड लाखांचा टप्पा पार केला होता. एकूण मतांच्या 10.93 टक्के म्हणजेच 1 लाख 58 हजार 251 मतांवर गायकवाड यांना समाधान मानावे लागले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीच्या आधी हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवीत मोदी लाटेत छगन भुजबळ यांचा गोडसेंनी दारुण पराभव केला. हेमंत गोडसे यांना 4 लाख 94 हजार 735 मते मिळाली तर छगन भुजबळ यांना 3 लाख 7 हजार 399 मते मिळाली होती. गोडसेंना मिळालेल्या मतांची टक्केवारी 31 टक्के होती तर छगन भुजबळ यांच्या मतांची टक्केवारी अवघी 19 टक्के होती.
नाशिकच्या जागेवरून अगोदरपासून वाद सुरु असताना नव्याने महायुतीत दाखल झालेल्या भुजबळांनी शिवसेना-भाजपाची डोकेदुखी वाढवली आहे. छगन भुजबळ संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्ते तयारीला लागले असून उद्या पुण्यात या संदर्भात बैठक देखील होणार आहे. कुटुंबासाठी या जागेची मागणी केली नसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला असला तरीही साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला इतर ठिकाणी जागा पाहिजे, या चर्चेला भुजबळांनी दुजोरा दिला आहे.आता त्यांच्या एन्ट्रीन नाशिक मतदारसंघातील तिढा वाढणार कि त्यांना उमदेवार दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .