मुंबई – कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार फडणवीस जाहीर करतात, जाहीर झालेले उमेदवारही तेच बदलायला लावतात, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात, अशी झोंबणारी टीका शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना घेऊन सरदेसाई जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.
कल्याणातून दुसरा उमेदवार का नाही?
शिवसैनिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी, शिवसैनिकांना मोठं करण्यासाठी शिंदेंची शिवसेना काम करेल, असं मुख्यमंत्री मोठ्या तोंडानं सांगत होते. मग कल्याणातून पुत्र श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा संधी का देण्यात येतेय, दुसऱ्या शिवसैनिकाला या ठिकाणाहून संधी का नाही, असा जळजळीत सवालही सरदेसाई यांनी विचारलेला आहे. वडील मुख्यमंत्री असताना श्रीकांत शिंदे हे खासदारकीची निवडणूक का लढवतात, असा सवाल सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांना केलाय. सामान्य शिवसैनिकांना संधी देण्याची दानत शिंदेंमध्ये नसल्याचा जोरदार वारही सरदेसाई यांनी केलाय.
महायुतीत शिंदे करतात तरी काय?
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. मात्र नंतर ही उमेदवारी बदलून त्यांच्याजागी बाबूराव कहाळेंना संधी देण्यात आली. यावरुनही टीकास्त्र सोडण्यात येतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा उमेदवार बदलण्यात आला, असं वरुण सरदेसाई म्हणालेत. शिंदेंच्या शिवसेनेचे निर्णय फडणवीस घेत असतील, उमेदवारही तेच ठरवत असतील तर मुख्यमंत्री शिंदे करतात काय, असा सवाल सरदेसाईंनी विचारलेला आहे.
हेही वाचाःदोन भाजप – दोन शिवसेना, ठाणे जिल्ह्यात ठरला फॉर्म्युला