मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha )मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज( Shahu Maharaj )यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांनी आज पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे . शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये महाविकास मधील घटकपक्षाने आघाडी घेतली असून सोशल मीडियाच्या प्रचारांवर अधिक जोर दिला आहे.
आज पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. “शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा घेण्यात येईल. कोल्हापुरात शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे”, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचं (MVA )विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही. दुसरं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्षा रजिस्टर केलाय. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केलीय. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचंच घोंगड भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही. किंवा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात दीड तास चर्चा झाली. ते कोणते मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली. पुढे चर्चा सुरु राहणार आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.