मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind kejriwal) यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut )यांनी मोदींना कंस मामाची उपाधी देत टोला लगावला आहे. ते म्हणाले,कंस मामाला ज्यांची-ज्यांची भीती वाटत होती, त्यांना त्याने तुरुंगात टाकलं होतं. अगदी देवांनाही कंस मामाने तुरुंगात टाकलं होतं. पण त्याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्याने कंसाचा वध केला. या देशात आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्या कंस मामाला (PM Modi) भीती वाटते. आणि त्या कंस मामाला ज्यांची भीती वाटते, त्यांना ते थेट तुरुंगात टाकत आहेत”, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, केजरीवाल तुरुंगात राहुनही तुमच्या विरोधात काम करू शकतात. मुख्यमंत्री पदावर असणे किंवा नसणे ही मोठी गोष्ट नाही. केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत नसतील तर त्यात भाजपला अडचण होण्यासारखे काहीच नाही. ही एक मोठी लढाई आहे. ही देशाची दुसरी महत्त्वाची स्वातंत्र्य लढाई आहे. मुख्यमंत्री पदावर असणे किंवा नसणे ही मोठी गोष्ट नाही. पण अरविंद केजरीवाल यांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून निवडलं. भाजप, ईडी किंवा सीबीआयने त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही”, अशा शब्दांत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.याशिवाय, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदी राहावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल हे लोकांचे नेते असून लोकांनी त्यांना निवडून आणलं. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदावर राहायचं की नाही राहायचं हे लोकच ठरवतील. पण आम्ही असे मानतो की, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदी राहावे”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.