मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या शिरुर मतदार संघातून (Shirur Lok Sabha)विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात माजी खासदार आणि आधी शिंदे गटात असलेले पण उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील(Shivajirao Adhalrao Patil) रिंगणात आहेत .त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे . दरम्यान, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचे एक ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ” गेट वेल सून … शिवाजी आढळराव पाटील ” ;असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आढळराव पाटलांचा प्रचारातील एक व्हिडीओ टाकला आहे.
जे संपूर्ण देशाने ऐकलं ते तुम्हाला ऐकू आलं नाही ?
जे संपूर्ण देशाने बघितलं ते तुम्हाला दिसलं नाही ?
नक्कीच काहीतरी गडबड आहे.
लवकर उपचार घ्या, लवकर बरे व्हा !
याआधी कांद्याच्या मुद्द्यावरून आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली होती . लोकसभेत पाच वर्षे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार कोल्हे यांनी 621 प्रश्न विचारले पण एकदाही कांद्याचा मुद्दा मांडलेला नाही.असे ते म्हणाले होते . आता यावरून कोल्हे यांनी आढळरावांवर ट्विट करत टीका केली आहे.ते म्हणले , गेल्या पाच वर्षांत संपूर्ण देशाने ऐकले पण बहुधा आढळरावांनी नीट ऐकले नसावे. कदाचित त्यांना बरे नसावे, म्हणून असे होत असेल असे म्हणत पाटलांना एक टोला देखील लगावला आहे.
दरम्यान उमेदवारी जाहीर होताच कोल्हे आणि पाटील यांची आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली आहे. आपापल्या भागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणे अशा प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातही उमेदवारांनी प्रामुख्याने गाठीभेटींवर जास्त भर दिला आहे. आपण केलेली कामे सांगणे आणि विरोधकांवर आरोप करणे, असाच प्रचार सध्या सुरू आहे. अशातच अमोल कोल्हे यांचे ट्विट चर्चेत आले आहे.