मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangale)लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली होती .आता हातकणंगले मतदारसंघासाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)यांना हिरवा कंदील मिळाला आहे . आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी याबाबत चर्चा झाल्यानंतर माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे . आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध माने यांच्यात पुन्हा एकदा लढत होण्याची शक्यता आहे .
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवल्यानंतर त्यांच्याविरोधात रिंगणात कोण उतरणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, तीन दिवसांमध्ये चर्चा मागे पडली त्यानंतर अन्य पर्यायांचा शोध सुद्धा भाजपकडून सुरू होता.दरम्यान ही जागा भाजप आपल्याकडे खेचून घेऊन येथून शौमिका महाडीक यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. दरम्यान रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अंतिम बैठक होऊन यामध्ये कुठल्या जागा कोणाला याची निश्चिती झाली. यानंतर रात्री दीड वाजता धैर्यशील माने आणि शिंदे यांची भेट झाल्यानंतर पहाटे माने यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विद्यमान खासदार माने यांना उमेदवारी मिळणार नाही या वारंवार होणाऱ्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे .
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेनेचे दोन्ही विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. गावोगावी भेट देऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.