मुंबई – मविआची बुधवारी झालेली जागावाटपाची बैठक कोणत्याही ठोस तोडग्याविना पार पडल्याचं आता सांगण्यात येतंय. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. या बैठकीत मविआच्या तिढा असलेल्या १५ आणि वंचितनं प्रस्ताव दिलेल्या ५ जागांवर अशी २० जागांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या चर्चेतून तोडगा निघालेला नसल्याचं दिसतंय.
वंचित सहा जागांसाठी आग्रही
मविआतील १५ जागांचा तिढा सुटल्यानंतर, वंचितच्या जागांचा प्रस्ताव देण्यात येईल, असं बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं. वंचित पाच जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यात अकोलोा, अमरावती, रामटेक, सोलापूर आणि दिंडोरी या पाच जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्याची माहिती आहे. याचबरोबर सांगलीची जागाही वंचितनं लढवावी असा आग्रह आंबेडकरांनी धरल्याची माहिती आहे.
सांगलीवरुन आधीच महायुतीत तिढा
कोल्हापुरातून शाहू छत्रपतींना मविआनं उमेदवारी दिली आहे. त्यांनी काँग्रेसेमधून निवडणूक लढवावी, असा आग्रह सतेज पाटील यांचा आहे. त्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी याला विरोध केलेला आहे.
राजू शेट्टी आणि जानकरांनाही सोबत घेणार?
मविआत वंचितचंच समाधान होत नसताना, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. जानकरांसाठी माढा मतदारसंघ सोडण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवलेली आहे. तर शेट्टींशीही बोलून त्यांनाही मविआत आणण्याचे प्रयत्न होतील असं सांगण्यात येतंय. मात्र शेट्टी ५ ते ६ जागांवर तर जानकर दोन जागांवर स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत.
शरद पवारांची शिष्ठाई सफल होणार का?
या सगळ्यात शरद पवार जातीनं लक्ष देत आहेत. मविआसोबत वंचित, शेट्टी आणि जानकरांना घेऊन कुठंही मत विभाजन होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचं दिसतंय. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी तीन ते चार वेळा फोनवरुन पवारांनी संवादही साधलाय.
चार जागांवर अद्यापही तिढा
बुधवारच्या बैठकीत तिढा असलेल्या १५ जागांवर चर्चा झाली, मात्र त्यात ४ मतदारसंघांवर अद्यापही सहमती झालेली नसल्याची माहिती आहे. त्यात जालना, शिर्डी आणि रामटेकवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलेला आहे. तर वर्धा मतदारसंघाची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केल्याची माहिती आहे.
आज, उद्याही मविआतील नेत्यांमध्ये चर्चा होणार असून, ९ मार्चला पुन्हा बैठक होणार आहे. मविआतील तिढा, वंचितची मागणी, शेट्टी, जानकरांची साथ या सगळ्यात सहमती कशी होणार आणि जागावाटप कधी होणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
हेही वाचाःमहायुतीत भाजपाला 32 पेक्षा जास्त जागा, शिवसेना, राष्ट्र्वादीला किती? उद्या अजित पवार दिल्लीत