मुंबई – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची आलेली रामनवमी विशएष महत्त्वाची मानण्यात येतेय. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत आलेल्या या रामनवमीचा वापर बरेच पक्ष राजकारणासाठी साधून घेताना दिसतायेत. राम मंदिराच्या निर्माणावरुन श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून आणि महायुतीकडून प्रचारात होताना दिसतोय. त्यातच महायुतीत नुकतेच सहभागी झालेल्या राज ठाकरे यांनीही रामनवमीच्या शुभेच्छा देशातल्या जनतेला दिल्या आहेत.
रामनवमीच्या शुभेच्छातूनही विरोधकांवर प्रहार
भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. असं राज ठाकरेंनी या एक्स पोस्टमध्ये लिहिलंय. मात्र त्यापुढे ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो. असं करत काँग्रेससह डावे आणि पुरोगाम्यांवर प्रहारही राज ठाकरेंनी केलेत.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.
भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली.
ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो.
धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो.
पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
हेही वाचाःपुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमची एन्ट्री, या नेत्याला दिली उमेदवारी