मुंबई : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता, हवामान बदलासाठीचे नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली.
अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी उपरोधिक शब्दांत सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्न उपस्थित केला. अतिवृष्टीनंतर राज्यातील विविध भागांत समोर आलेल्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी हजारो कोटींचा खर्च झाल्यानंतरही दरड कोसळल्याच्या घटनेवरून सरकारला लक्ष्य केले. प्रकल्प राबविताना हवामान बदलाचा आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास झाला होता का, तसेच क्लायमेट ऑडिट का करण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील रस्ते, पूल, सिमेंट काँक्रीटीकरण, डोंगर पोखरणे आणि शहरी नियोजनात दीर्घकालीन दृष्टीकोनाचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी विकासकामे उच्च दर्जाची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणारी असली पाहिजेत, असे सांगितले.
३० जून ते ६ जुलैदरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत झालेल्या दुर्घटनांचा उल्लेख करत त्यांनी मुंबई, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांतील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले. आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पुरामुळे वारकऱ्यांना आलेल्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला.
मुंबईतील काँक्रीटीकरणामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळत असल्याचा आरोप करत त्यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय नियोजनाला अधिक महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली.
सरकारने प्रत्येक वेळी नैसर्गिक आपत्तीवर जबाबदारी ढकलण्याऐवजी दोषपूर्ण कामांसाठी उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

