बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झालेला आहे. बारामतीत प्रचार करणाऱ्या अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
मुलीला संधी दिलीत आता सुनेला द्या
१९९१ साली बारामतीतून आपण खासदार झालो, त्यानंतर शरद पवार यांना बारामतीकरांनी निवडून दिलं. त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्या. आता पवारांच्या सुनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी बारामती करांना केलंय. असं केल्यानं भाऊही खूश, वडीलही खूश आणि सुनही खूश असंही अजित पवार म्हणालेत.
आता भावंडं गरागरा फिरतायेत
यापूर्वी या मतदारसंघात आपण अनेक निवडणुका लढवल्या. मात्र त्यावेळी अजित पवारांची भावंड कधी फारशी फिरली नव्हती. या निवडणुकीत मात्र गरागरा फिरतायेत. मात्र उद्या निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी अजित पवार आणि त्यांचे कार्यकर्तेच असतील, असं त्यांनी बारामतीकरांना सांगीतलंय.
मी तोंड उघडलं तर..
आता पवार भावंड आपल्याविरोधात उतरले असले, आणि प्रचार करत असले तरी आपण तोंड उघडलं तर सगळ्यांचं अवघड होईल, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. असा इशाराही अजित पवारांनी पवार कुटुंबीयांना दिलाय. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पाटील, पुतण्या युगेंद्र पवार, रोहित पवार, वहिनी शर्मिला पवार, चुलत बंधू राजेंद्र, पुतणी सई, आत्या सरोज पाटील यांच्यावर अजित पवारांनी हल्लाबोल केल्याचं मानण्यात येतंय. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर कुटुंबात एकटं पाडण्यात आल्याची भावना अजित पवारांनी यापूर्वीही व्यक्त केली होती.
प्रचाराचा स्तर बदललाय- अजित पवार
यापूर्वी बारामतीत शरद पवारांकडून केवळ मतदानापूर्वी एक सभा होत असे. आता मात्र प्रचाराचा स्तर बदलला आहे. आता त्यांना सगळीकडे फिरावं लागतंय. काही ठिकाणी भावनिक तर काही ठिकाणी दम देण्यात येतोय. असं सांगत त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही लक्ष्य केलंय. येत्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.