मुंबई
लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्यांचं लक्ष असलेल्या महायुतीचं जागावाटप निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागावंर लढणार आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत कमी जागा मिळाल्याचं दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे १३ खासदार सद्यस्थितीत आहेत. मात्र त्यांना लोकसभेसाठी १० जागा मिळणार असल्यानं तीन लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी सोडावे लागणार आहेत.
कोणते तीन लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे
शिंदेंच्या शिवसेनेतील काही खासदार हे भाजपाच्या चिन्हावर लढतील असं यापूर्वी सांगण्यात येत होतं. मात्र प्रत्यक्ष जागावाटपात तीन लोकसभा मतदारसंघच भाजपानं शिंदेंच्या शिवसेनेकडून घेतल्याची माहिती आहे. यात दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पालघर या तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेत आलेले मिलिंद देवरा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपाच्या आग्रहामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आल आहे. त्यामुळं ही जागा भाजपाला मिळणार, हे निश्चित असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर आणि पियुष गोयल या तीन भाजप नेत्यांची नावं या मतदारसंघातून चर्चेत आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती, मात्र सर्व्हेत किरण सामंत यांच्या बाजूनं कल नसल्यानं, या ठिकाणी नारायण राणे यांना रिंगणात उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राणे यांची राज्यसभेची खासदारकीची टर्म संपल्यानंतर त्यांना लोकसभेत उतरवणार असल्याची चर्चा आहे. राणे स्वत: निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. मात्र भाजप त्यांना रिंगणात उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राणे यांचे पुत्र निलेश राणे यांची कुडाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे चिंतामण वनगा हे खासदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित निवडून आले होते. २०१९ साली पालघर शिवसेनेला सुटल्यानं, राजेंद्र गावित सेनेच्या कोट्यातून निवडून आले. यावेळी गावित हे भाजपाच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहेत.
अजित पवार गटाला सहा जागा
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदेंना आणि अजित पवारांना मिळालेलं वाटप समसमान राहिलेलं आहे. शिंदेंना ९ मंत्रीपदं मिळाली, तितकीच मंत्रिपदं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. राज्यसभा निवडणुकीतही शिंदे आणि अजित पवारांना एकेक खासदाराची संधी मिळाली. लोकसभा जागावाटप याच समसमान न्यायानं व्हावं अशी आग्रही भूमिका अजित पवारांच्या बाजूनं घेण्यात आली होती. मात्र लोकसभा जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद पाहता त्यांना सहा जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा – मराठ्यांचं स्वप्न पूर्ण होणार? मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन