नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र निवडणुकीचा प्रचार करायलाही आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र कोणतंही न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोगाचं याकडे लक्ष नाही. सगळेजणं गप्प बसून ड्रामा बघत आहेत, असं म्हणत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
आयकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली प्रकरणात काँग्रेसने आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधीदेखील यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या. काँग्रेसची बँक खाती महिनाभरापूर्वी गोठवण्यात आली होती. एखादी संस्था, कंपनी किंवा कुटुंबाच्या बाबतीत असं घडलं असतं तर ते संपूनच गेलं असतं. आमच्यावर इतकी मोठी कारवाई झाली तरी कोणतंही न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोग यावर बोलायला तयार नाही, असं म्हणून राहुल गांधी बरसले.
बँक खाती गोठवल्यामुळे रेल्वे तिकीटासाठी पैसे नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमचे नेते प्रवासही करू शकत नाही. निवडणुकीसाठी आम्ही प्रचारही करू शकत नाही, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. विना बँक खाते आम्ही निवडणूक कशी लढणार, जर तुमचं बँक खातं बंद केलं, एटीएम बंद केलं तर तुम्ही जगणार कसं? असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित केला जात आहे.