आरपीआय कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी होण्याची केली विनंती
X: @therajkaran
मुंबई: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची मुंबईतील बांद्रा येथील कार्यालयात भेट घेऊन शिर्डी आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आरपीआयच्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले महायुतीकडून इच्छुक होते. त्यासाठी आठवलेंनी भाजप नेतृत्त्वाकडे विनंती केली तसेच नगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे नेते विखे यांच्याकडे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात आठवलेंना शिर्डीची जागा न मिळाल्याने आरपीआय कार्यकर्त्यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विखे यांनी आठवलेंची भेट घेत कार्यकर्त्यांना प्रचारात उतरण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती केली.
महसूलमंत्री विखे पाटील हे गुरुवारी रात्री केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या बांद्र्यातील कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी आठवले भांडूपमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते. त्यामुळे विखेंना तीन तास आठवलेंची वाट पाहत बसावे लागले. रात्री ११ वाजता आठवले आल्यानंतर विखे आणि त्यांच्यात अर्धा तास बैठक झाली. यात शिर्डी आणि दक्षिण अहमदनगरमध्ये आरपीआय कार्यकर्ते प्रचारात सहभागी नाहीत. आपण महायुतीत आहोत. महायुतीचा धर्म म्हणून कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभागी व्हावे. तसेच, आपण स्वत: नगर जिल्ह्यात दोन्ही उमेदवारांकरिता एक जाहीर प्रचारसभा घ्यावी, अशी विनंती केली. त्यावर, आरपीआय कार्यकर्त्यांना सूचना देऊ, अशी ग्वाही आठवले यांनी विखे यांना दिली. आता आरपीआय कार्यकर्ते सुजय विखेंच्या प्रचारात सहभागी होतात की नाही हे येत्या काही दिवसात दिसून येईल.
आरपीआय कार्यकर्त्यांची विखेंवर नाराजी का?
सन २०१२ मध्ये आरपीआय नेते रामदास आठवले महायुतीत आल्यापासून राज्यसभेत आहेत. गेली सात वर्षे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री असलेले आठवले यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. भाजपसह महायुतीकडे आठवलेंनी मागणीही केली होती. नगर जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही आठवलेंसाठी शब्द टाकावा, अशी मागणी आरपीआय कार्यकर्त्यांनी केली. पण जागावाटपात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठीच ही जागा सुटली त्यामुळे आरपीआय कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे आरपीआय कार्यकर्त्यांनी शिर्डीसह दक्षिण अहमदनगर मतदारसंघात प्रचारावर बहिष्कार घातला आहे. २००९ मध्ये शिर्डी मतदारसंघात आठवलेंच्या पराभवासाठी तत्कालीन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे जबाबदार होते, असा आरोप विखेंवर झाला होता. त्यामुळेही आरपीआयचे कार्यकर्ते सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर असल्याचे बोलले जाते. दक्षिण नगरमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे विखेंनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे.