मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanangle Lok Sabha constituency )शिंदेसेनेचे धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) १४ हजार ७२३ मतांनी विजय झाले. त्यांनी १५ व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला आहे . महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या १५ पैकी ७ जागा निवडून आल्या आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना एनडीएतील घटकपक्ष असल्यामुळे त्यांना दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे . यामध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने यांची केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत वर्णी लागण्याची शक्यता आहे .त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहचली आहे .
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या दोन खासदारांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्रतापराव जाधवही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. प्रतापराव जाधव सीनियर नेते आहेत तर श्रीरंग बारणे यांनी तीन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. दरम्यान हातकणगले लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत ही शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यामध्ये झाली. तिन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असल्याने निकाल कसा असणार याची कमालीचे उत्सुकता होती.अखेर बाजी पलटली आणि खासदार धैर्यशील माने यांनी विजयाचा गुलाल उधळला .
हातकणंगले मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी खास करून धैर्यशील माने यांच्या विजयासाठी तळ ठोकून आवश्यक ते बदल करीत मानेंना पाठबळ दिले. किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच माने यांचा विजय सोपा झाला, असेच म्हणावे लागेल. येणाऱ्या काळात लोकसंपर्क वाढवून लोकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे आव्हान माने यांच्यासमोर तर ऊसदराच्या चळवळीतून एक वेळ आमदार आणि दोनवेळा खासदारकीचा बहुमान मिळवलेल्या राजू शेट्टी यांना मात्र दुसऱ्यांदा पराभव पचवावा लागला आहे.