मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएने (NDA) संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे . नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली असून सायंकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्र्पती भवनातून समोर आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्याकडून नरेंद्र मोदींना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ कळवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावांची यादी देखील मागवण्यात आली आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने 294 जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी एकट्या भाजपने 240 जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडी 232 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसनं 99 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धक्का बसला असून 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे . या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत .राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएच्या घटकपक्षांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्यानंतर एनडीएला बहुमत मिळू शकते अशी खात्री झाल्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम 75(1) च्या अनुसार नरेंद्र मोदींची भारताच्या पंतप्रधान पदी नियुक्ती केली आहे .उद्या ९ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल.
लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. जदयूचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी भाजपसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केल्यानं केंद्रात एनडीएच्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे . भाजप, जदयू, टीडीपी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि लोकजनशक्ती पार्टी आणि इतर पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्यावर एनडीएनं बहुमताचा टप्पा पार केला आहे.