नागपूर : आज महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपुरापासून साधारण ८० किलोमीटरवर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी चार वाजता प्रचार सभा पार पडणार आहे. मात्र पूर्व विदर्भात मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या दिवशी मतदार प्रभावित होतील अशा प्रकारच्या कार्यक्रमास मनाई असते. मग मोदींच्या सभेला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही यावरुन टीका केली जात आहे.
आज महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघ नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या पाच मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यातील तळेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मोठी तयारीही करण्यात आली आहे. ३५ एकरात मंडप उभारण्यात आला असून पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही जाहीर सभा सुरू होईल. यापूर्वी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात सभा घेतली होती. मात्र आता त्यांच्या सभेवरुन सवाल उपस्थित केले जात आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग केला जात असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.