मुंबई – पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहेत. त्यात दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात प्रचंड चुरस आहे. अशात दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार ठरला असल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबईची जागा भाजपा लढणार असून, मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आहे. आज दिवसभरात या नावाची घोषणा होऊ शकते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या जागेसाठी इच्छुक होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता, मात्र अखेरच्या क्षणी ही जागा मंगलप्रभात लोढा यांना सोडण्यात आली आहे.
मराठी विरुद्ध अमराठी अशी लढत होणार
मारवाडी जैन असलेले मंगलप्रभात लोढा यांना दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरवल्यानं आता ही लढत मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी जैन अशी होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपानं अमराठी उमेदवार दिल्याचा जोरदार प्रचार होईल अशी शक्यता आहे.
मनसे काय भूमिका घेणार?
नुकतीच महायुतीत आलेली मनसेही या उमेदवारीबाबत काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. राज ठाकरे यांनी मराठी माणूस हा त्यांचा अग्रक्रम ठेवलेला आहे. लोढा यांची उमेदवारी मनसेलाही फारशी पसंतीस पडणार नाही, अशी शक्यता आहे. मनसेच्या काही नावांचीही या मतदारसंघात चर्चा सुरु होती. मात्र धनुष्यबाण चिन्हावर लढण्यास राज ठाकरेंनी इन्कार केल्यानं या जागी आता भाजपाला संधी मिळेल असं दिसतंय.
शिंदेंनी आणखी एक जागा गमावली
रत्नागिरी-सिंधुदुर्गपाठोपाठ दक्षिण मुंबईची जागा भाजपाला गेल्यास एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल. आणखी एक हक्काची जागा शिंदे यांनी गमावल्याची भावना नेत्यांत आणि कार्यकर्त्यांत जाण्याची शक्यता आहे.
गुजराती, मारवाडी उमेदवार, मराठी माणसाचं काय?
भाजपानं आत्तापर्यंत उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईचे उमेदवार जाहीर केले आहेत. या दोन्ही ठिकाणी पियुष गोयल आणि मिहीर कोटेचा हे अमराठी चेहरे भाजपानं दिलेले आहेत. तर दक्षिण मुंबईत लोढा यांना संधी देऊन भाजपा मराठी माणसावर अन्याय करत असल्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईत भाजपा योग्य मराठी चेहऱ्याच्या शोधात आहे. मात्र अद्याप नावाची निश्चिती झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. लोढा यांच्या उमेदवारीनं मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः19 राज्ये आणि 102 मतदारसंघ; आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात