मुंबई- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे. आता सांगली मतदारसंघ काँग्रेसला द्यावा आणि त्याऐवजी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावा, असा प्रस्ताव आता देण्यात आल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिल्याचं सांगण्यात येतंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडं सांगली मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ असल्याचं सांगत, काँग्रेसनंही या जागेवर आग्रह धरलेला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी या जेगावरुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हे बंड काँग्रेसचंच आहे, असं ते सांगतायेत. ठाकरेंच्या शिवसेनमेचा ग्रामपंचायत सदस्य नसतानाही, या जागेसाठी मविआत घेण्यात आलेल्या आग्रही भूमिकेवर आक्षेप व्यक्त करण्यात येतायेत. सुषमा अंधारे यांनी पुण्यात मविआच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेत विश्वजीत कदम यांना ठाकरेंच्या शिवसेनेला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. त्यावर विश्वजीत कदम यांनी पहिली निष्ठा काँग्रेसवर असल्याचं सांगत, सांगलीच्या जागेसाठी आग्रह कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे.
उत्तर मुंबईतून घोसाळकरांचा संधी?
मविआत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा मुंबईत काँग्रेसला सोडण्यात आल्यात. उ. मुंबईत काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्यानं उमेदवाराचा शोध सुरु आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसैनिक करतायेत. घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांची स्नुषा तेजस्वी घोसाळकर यांच्याही नावासाठी आग्रह धरण्यात येतोय. घोसाळकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढावं अशी ऑफर नाना पटोलेंनी दिल्याचं घोसाळकर यांनी सांगितलंय. मात्र घोसाळकर हे धनुष्यबाणावरच लढण्यासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय.
चव्हाणांचा काय प्रस्ताव
या स्थितीत मविआमध्ये सांगली आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीचा प्रस्ताव देण्यात आलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना हा प्रस्ताव दिलाय. सांगलीची जागा काँग्रेसला द्या, असा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. सांगलीच्या बदल्यात उ. मुंबईची जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं लढवावी असं त्यात सांगण्यात आलंय. या अदलाबदलीत दोन्ही पक्षांना आणि मविआला फायदा होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलंय. मविआतील प्रमुख नेते मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगतायेत. संजय राऊत यांनी असा कोणताही प्रस्ताव नस,ल्याचं स्पष्ट केलेलं आहे. सांगली आणि उ. मुंबई मतदारसंघांसाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अदलाबदलीचा निर्णय होतो का, हे आता पाहावं लागणार आहे. शुक्रवारी सांगली लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात का, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
हेही वाचाःदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदलवार ठरला, भाजपाच्या मंगलप्रभात लोढांना तिकीट?