मुंबई- सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मोहीम दिल्ली फत्ते करुन वाजतगाजत परतलेल्या छ६पती उदयनराजे भोसले यांना अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. सोमवारी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावरही पाहायला मिळाले. मात्र अद्यापही उदयनराजेंना तिकीट मिळेल की दुसऱ्या कुणाला याची धाकधूक कार्यकर्ते आणि समर्थकांत कायम आहे. महायुतीत साताराची जागा ही अ्जित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. नाशिकची जागा अजित पवारांना सुटली तरच साताऱ्याच्या जागेवरचा हक्क सोडण्यास ते तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळं साताऱ्याचा पेच अद्यापही महायुतीत कायम आहे. नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुनही महायुतीत पेच कायम आहे.
नाशिकमध्ये हेमंत गोडसे आग्रही
नाशिकमधून छगन भुजबळ रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरु झाल्यानंतर, शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई, ठाण्यात दोन ते तीन वेळा शक्तिप्रदर्शन केलेलं आहे. नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी ते सातत्यानं मुख्यमंत्र्यांना समर्थकांसह भेटताना दिसतायेत. त्यांनी स्वतंत्र प्रचारही सुरु केला आहे. जागा भुजबळांना मिळाली तर गोडसे या मतदारसंघातून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. या जागेचा निर्णय करणं अवघड आहे. कारण या जागेवर साताऱ्याच्या जागेचा निर्णय होणार आहे.
ठाण्याचाही पेच कायम
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा आग्रही आहे. तर शिंदेंचा हा बालेकिल्ला असल्यानं हा मतदारसंघ सोडण्यास शिंदेंची शिवसेना तयार नसल्याचं सांगण्यात येतंय. ठाणे परिसरातील तिन्ही लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत, त्यातील एक मतदारसंघ भाजपाला मिळावा, असा भाजपाचा आग्रह आहे. आता यावर राज्य पातळीवर तोडगा निघणार की हा प्रश्न दिल्ली दरबारी सोडवला जाणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःसांगलीबाबत सोनिया गांधींचा सल्ला उद्धव ठाकरे ऐकणार का? शरद पवारांकडे काय दिलाय निरोप?