मुंबई- अमरावती लोकसभा मतादरसंघातून अखेर भाजपाच्या उमेदवाराच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. युवा स्वाभिमानच्या खासदार नवनीत राणा यांना भाजापनं उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर रात्री उशिरा नवनीत राणा यांनी नागपुरात भाजपात प्रवेश केला. रवी राणा यांनी नेहमीच अपक्ष असतानाही भाजपाची साथ केली होती. आता पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर भाजपात प्रवेश करत असल्याचं राणा यांनी स्पष्ट केलंय. राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपाचे पदाधिकारी, शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेल्या बच्चू कडू यांचा विरोध होता. मात्र तरीही राणा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.
बच्चू कडू स्वतंत्र रिंगणात उतरण्याची शक्यता
राणा यांच्या पक्ष प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही ते फारशे समाधानी दिसले नव्हते.
राणांच्या उमेदवारीनंतर कडू म्हणालेत की, ज्या राणांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केला, भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्यांनाच पक्षानं आता तिकीट दिलेलं आहे. पाकिस्तानातून उमेदवार आणा, मात्र पक्ष महत्त्वाचा असा संदेश यातून गेल्याची टीका त्यांनी केलीय.
कडूही लोकसभेच्या रिंगणात?
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती या पक्षाचे अमरावतीत दोन आमदार आहेत. कडू यांनीही लोकसभा लढवावी असा आग्रह धरण्यात येतोय. वर्धा लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडूही चाचपणी करताना दिसतायेत. आता महायुतीत अडसूळ आणि कडू हे एकत्रित राणा यांना विरोध करण्याची शक्यता आहे. अशात या दोन्ही नेत्यांची समजूत कशी काढण्यात येईल, ते पाहावं लागणार आहे.
राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा दोन दिवसांत निकाल
नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बोगस पजात प्रमाणपत्र दिल्याचा अडसुळांचा आरोप आहे. या प्रकरणात गेल्या साडे चार वर्षांपासून सुप्रीम कोर्टात याचिका आहे. त्यावर १ एप्रिलला निर्णय येण्याची शक्यता आहे. हा निर्णय राणा यांच्या विरोधात गेल्यास राणा यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचाःसिंधुदुर्ग-रत्नागिरीचा महायुतीचा उमेदवार ठरला, नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात होणार लढत