मुंबई
आज राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणावर निकाल असल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष आज सायंकाळी हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेगळा निकाल लागू शकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अपात्र झाले तर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होऊ शकते.
अजित पवार राष्ट्रवादी फोडून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी वाढवलेली मुदत आज संपत असून विधानसभा अध्यक्ष आज आपला निकाल जाहीर करतील.
निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं आहे. शरद पवार गट हा वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.
अजित पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील 41आमदार
- नागालँडमधील 7 आमदार
- झारखंड 1 आमदार
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1
शरद पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील आमदार 15
- केरळमधील आमदार 1
- लोकसभा खासदार 4
- महाराष्ट्र विधानपरिषद 4
- राज्यसभा – 3