X: @therajkaran
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. तसं झालं असतं तर घरवापसी झालेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते. आज होणारा हा संभाव्य प्रवेश मात्र टळला आहे.
यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या चर्चांना काही अर्थ नाही” “निलेश लंके यांच्या प्रवेशावर माहीती नाही. लंके पक्षप्रवेश करणार ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकतोय”, असं सांगत त्यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार गटात गेलेल्या लंकेंना परतीची साद घातली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चांना जोर आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, चर्चेत काहीही तथ्य नाही. जे सोडून गेले आहेत, त्यांनाही हे काही बरे चालले नाही, हे कळत आहे. त्यामुळे अशा अनेकांच्या चर्चा आहेत, अनेक इच्छूक आहेत. यासंबंधी माहिती तपासून, योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे पवार म्हणाले. त्यामुळे लंके यांच्या घरवापसीच्या चर्चेवर तूर्त तरी पडदा पडला आहे.
शरद पवार यांनी ईडीच्या (ED) गैरप्रकारावरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देशातील यंत्रणेचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांचा विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही केला जात नव्हता. ईडी, सीबीआय किंवा अन्य यंत्रणांचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना नमोहरण करण्यासाठी केला जातोय. यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्रातही असा प्रकार घडत आहे. अनिल देशमुखांवरही (Anil Deshmukh) अशीच कारवाई करण्यात आली. आता रोहित पवारांवर (Rohit Pawar) देखील कारवाई करण्यात येत आहे. जाणूनबुजून एका सक्रीय कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असा दावा पवार यांनी केला.