नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामटेकमध्ये सभा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही रोड शो होणार आहे. 19 एप्रिल रोजी नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवसा राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार केला जात आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता पूर्व विदर्भातील प्रचारतोफा थंडावणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघ
नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. या जागेवरुन महायुतीकडून भाजपचे नितीन गडकरी तर मविआतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे रिंगणात उतरले आहेत. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या लोकसभा मतदारसंघत दक्षिण-पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर अशा विधानसभा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडे पाहिले तर सर्वच मतदारसंघात काँग्रेसला निम्मी मतं मिळाली आहेत. दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये तर ही मतं निम्म्याहून अधिक असल्याचं दिसून येत आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ
देशाला पंतप्रधान मिळवून देणारा म्हणूनही हा मतदारसंघ ओळखला जातो. पी व्ही नरसिंहराव दोनवेळा रामटेक लोकसभेतून निवडून गेले होते. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची या मतदारसंघातून घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर शेवटी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे मविआकडून रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे महायुतीकडून लढणार आहे. रामटेकचा गड आपल्याकडे यावा यासाठी भाजप नेते इच्छुक होते, मात्र शेवटपर्यंत शिंदेंनी आपला आग्रह सोडला नाही आणि शेवटी राजू पारवेंना काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी दिली.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. भाजपचे संजय कुंभलकर हे बसपच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे दोघे अपक्ष मैदानात उतरले. वंचितने संजय केवट नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होणार असेच चित्र आहे. भाजपचे अशोक नेते हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र सत्ताविरोधी वातावरणाचा त्यांना फटका बसू शकतो. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे सरकारी अधिकारी होते. गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. ते हलबी समजाचे प्रतिनिधित्व करतात. नेते यांची तिसरी टर्म असल्याने सत्ताविरोधी वातावरणाचा त्यांना लाभ मिळू शकतो.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार विरूद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे. काँग्रेसने या जागेवरुन काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन सहानुभूती तसेच कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यात या जागेवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओबीसी मतांसाठी छगन भुजबळ आज चंद्रपुरात प्रचारसभा घेणार आहेत.