मुंबई
राज्यसभा निवडणुकीचा तारीख जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १५ राज्यातून निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून ६ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे कुमार केतकर, ठाकरे गटाचे अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांचा समावेश आहे.
सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला आपला गड राखता येईल का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान विनोद तावडे यांना राज्यसभेवर जाण्याची दाट संधी आहे. याशिवाय पंकजा मुंडे आणि विजया राहाटकर यांच्याही नावांची चर्चा आहे. मात्र विनोद तावडेंचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. तावडेंच्या रणनीतीमुळे बिहारमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे तावडेंना राज्यसभेत जाण्याची शक्यता अधिक आहे.
हे ही वाचा – राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?
त्याशिवाय महाराष्ट्रातील ६ पैकी २ राज्यसभेच्या जागा पुण्यातून रिक्त होत आहेत. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
कसा असेल राज्यसभा निवडणूक कार्यक्रम…
- अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – ८ फेब्रुवारी.
- अर्ज करण्याची मुदत – १५ फेब्रुवारी
- उमेदवारांच्या अर्जांची छाननी – १६ फेब्रुवारी
- अर्ज मागे घेण्याची तारीख – २० फेब्रुवारी
- मतदान – २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
- मतमोजणी – २७ तारखेला सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर.