अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेतेमंडळींमनध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकलेल्या आणि काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करीत अमरावतीतून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांच्या पतीने खळबळजनक दावा केला आहे.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी भाजपसोबत जावं अशी पवारांची इच्छा होती. त्यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं असंही रवी राणा यावेळी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेत शरद परावांनी मागच्या निवडणुकीत चूक झाल्याचं मान्य केलं आणि अमरावतीकरांची माफीही मागितली. नवनीत राणा यांना पाठिंबा देणं ही चूक होती, आता ती चूक कधीही होणार नाही असं पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.
शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रवी राणा यांनी धक्कादायक दावा केला आहे. शरद पवारांच्या मनामध्ये भाजप आहे. आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या दबावामुळे ते भाजपविरोधात बोलत असते तरी त्यांचा विरोध हा केवळ ओठांवर आहे. सुप्रिया सुळे यांच्या हट्टामुळे त्यांना भाजपसोबत जाता येत नसल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे.
आतापर्यंत शरद पवारांसह मविआतील नेत्यांवर टीका करणाऱ्या राणा दाम्पत्याच्या या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.