मुंबई
X : @MeenalGangurde8
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या १० वर्षात भाजप सरकारच्या योजनांबद्दल अपडेट दिली. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर आता एक महिला नेत्याने निर्मला सीतारमण यांना सवाल उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्पावेळी सीतारमण म्हणाल्या, की सरकारने गेल्या १० वर्षात देशात 7 आयआयटी, 7 आयआयएम उघडले, यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, मागच्याच पावसाळी अधिवेशनात सरकारतर्फे सांगितले गेले की, गेल्या ५ वर्षात एकही IIM किंवा IIT देशात उघडले नाही. सर्रास खोटे बोला पण रेटून बोला ही भाजपाची गोबेल्स नीती आहे. कदाचित पुन्हा सत्तेत येणार नाही याची खात्री पटल्यामुळेच गेल्या दहा वर्षाचा पाढा वाचला गेला, अशा शब्दात खडसेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या..
आयकरदात्यांना कुठलाही दिलासा देण्यात आला नाही. ना बेरोजगारांना दिलासा दिला ना शेतकऱ्यांना.. समाजातील तळागाळातील घटकांसाठी काहीही ठोस उपाय योजना नाही. श्रीमती सितारामन म्हणतात की महागाई जैसे थे आहे. मात्र लोकांच्या उत्पन्नात ५०%नी वाढ झाली. कोणाच्या उत्पन्नात मॅडम? सामान्य मध्यमवर्गीय महिलेला जाऊन जाऊन विचारा.. ती माऊली कसा संसाराचा गाडा हाकत आहे… हो लोकांच्या नसेल पण तुमच्या उद्योगपतींच्या उत्पन्नात मात्र भरघोस वाढ झालीय हे मात्र सत्य आहे, असं म्हणत रोहिणी खडसेंनी सीतारमण यांना दावा खोडून काढला.