मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अजूनही धुसफूस सुरु आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Election) चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) नाराजी पसरली आहे. या मतदारसंघात काँग्रेस अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम आहे . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Prakashbapu Patil) हे सांगलीतून काँग्रेसचे उमेदवार आहेत. हा मतदारसंघ अनेक वर्षे काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिलेला आहे. मात्र यासाठी आता महाविकास आघाडीने नवा डाव टाकला आहे . विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर (Rajya Sabha)पाठवण्याच्या पर्यायावर मविआ विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशाल पाटील यांचा विशेष विचार करून त्यांचं या लोकसभेऐवजी राज्यसभेकडे राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करता येईल यासाठी यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढला आहे तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीत पूर्ण पाठींबा दिला जाईल अशाही चर्चा सुरु आहेत . याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसल्याची माहीत समोर आली आहे .मात्र या प्रस्तावासाठी काँग्रेस पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या प्रस्तावावर विशाल पाटील यांची नाराजी दूर झाली तर महाविकास आघाडी एकत्रित चंद्रहार पाटील यांचा प्रचार करेल अशी अपेक्षा महाविकास आघाडीचे नेत्यांना वाटत आहे.
सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या दौऱ्याला मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विशाल पाटील हे मुंबई आहेत तर,विश्वजीत कदम हे पुण्यात आहेत. सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत हे जत या मतदार संघात आहेत. सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. या लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी मधे मैत्रीपूर्ण लढत घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता पण त्यावर अजून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही आहे. सांगलीतील काँग्रेस नेत्यांची ठाकरे गटावर नाराजी आहे.आता विशाल पाटील यांच्या राज्यसभेच्या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .