मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे . एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde)शिवसेनेचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेसोबत गेलेल्या त्याच आमदारांचा पत्ता आता या निवडणुकीत कट झाला आहे त्यामुळे त्यातीलच सात आमदार ठाकरे गटात येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे . दरम्यान शिवसेना फुटीनंतरही या निवडणुकीत ठाकरेंचाच दरारा पाहायला मिळणार आहे .
राष्ट्रवादीत बंड करून शिंदेच्या शिवसेनेत गेलेला अजित पवार गटही गोधळलेला आहे . या निवडणुकीत जागेवरून त्यांच्यात धुसफूस दिसून आलीच आहे . भाजपची ही दमछाक होत आहे ,या निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . दरम्यान सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. यावर विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही. ती जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती. सगळ्या वादात फार ताणून घ्यायचे नाही. नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
विद्यमान सरकारच्या बाबतीत जनतेच्या मनात चीड आहे .हुकूमशाही दाखवून हे सरकार काम करत आहे . त्यांचा अब कि बार ४०० चा नारा हा तडीपार होणार आहे . या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. लोकांना भीती वाटते की, स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम असू. जनतेने ठरवले आहे की, भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर काढायचं. गडचिरोली तर आम्ही जिंकूच, भाजपला दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत आमचे किरसान उभे आहेत, ते निवडून येतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे .