X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, मविआतील जागा वाटप झाले असून ते लवकरच जाहीर करण्यात येईल, असे वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सांगण्यात येत आहे. उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी मविआची (MVA) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या प्रचाराची पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या घोषणा होण्याआधीपासूनच उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. आम्ही थांबलेलो नाही. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संयुक्त सभा होत आहेत. त्यासंदर्भात उद्या गुरुवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी मविआची बैठक होणार आहे. उद्या सकाळी ही बैठक होणार असून त्याच्या माध्यमातून पुढील कार्यक्रम आखला जाणार आहे. पण नावांच्या याद्या आलेल्या नसल्या तरी निवडणुका अडलेल्या नाहीत आणि महाराष्ट्रातील 48 जागांवर मविआची उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे राऊतांकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मविआत सहभागी व्हावे, ही आमची भूमिका आहे. त्यासंदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मकपणे चर्चाही केली आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत तसे निर्णय घेतले जातील. यामध्ये कोणाचाही आडमुठेपणा नाही. सर्वकाही गुण्यागोविंदाने सुरू आहे, असे म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा वंचितला मविआमध्ये घेण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे मविआसोबत हातमिळवणी होऊ शकणार नाही, असे कालच स्पष्टपणे सांगितले आहे.