X: @NalavadeAnant
नागपूर: नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला येथील विधिमंडळातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी बहाल केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
चार महिन्यांपूर्वी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल ४३ आमदारांचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटून (Split in NCP) सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये (Shinde – Fadnavis government) सामील झाला. लागलीच अजित पवार यांना त्याची बक्षिसी स्वरूप म्हणून उपमुख्यमंत्री व एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. सरकारमध्ये सामील झाल्या – झाल्या त्यांच्या गटाच्या ९ आमदारांना मंत्रिमंडळाचा खास विस्तार (cabinet expansion for Ajit Pawar) करुन कॅबिनेट मंत्रीपदही बहाल करण्यात आले.
अशात आता या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या माध्यमातुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बुधवारी विधानभवनात पुन्हा एक जोरदार झटका दिला. त्यांचे कार्यालयच हिसकावून घेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अध्यक्षांच्या या कृतीने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) संतप्त झाले आहेत. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असून आम्हाला पक्ष कार्यालय कोणाकडे मागण्याची गरजच नाही. परंतु, अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात जर असा निर्णय घेतला असेल तर तो पूर्वग्रहदूषितपणे घेतलेला दिसतो, अशा शब्दांत आपली चीड व्यक्त केली. यात उल्लेखनीय असे की, एक वर्षापूर्वी याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यालय दिले होते.