जळगाव- भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील यावेळची लढत चुरशीची होणार असं मानण्यात येतयं. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू करण पवार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरेंकंडून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपाकडून स्मिता वाघ या रिंगणात आहेत. त्यामुळं ही लढत भाजपा विरुद्ध भाजपा अशीच होणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर वंचित बहुजन पार्टीच्या वचीनं या ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आलीय. आता या तिरंगी लढतीत कुणाला फायदा होणार हे पाहावं लागणार आहे.
स्मिता वाघ यांना किती संधी?
भाजपाच्या एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या स्मिता वाघ यांना २०१९ साली तिकीट देऊन नंतर ते बदलण्यात आलं होतं. १९९२ पासून भाजपाशी संबंधित असलेल्या स्मिता वाघ जिल्हा परिषदेवर तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. २००९ साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलंय. २०१७ साली त्यांना विधान परिषद आमदारकीही मिळाली होती. जिल्ह्यात दांगा जनसंपर्क असला तरी यावेळी पक्षातूनच उन्मेष पाटील यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यातच उमेदवार बदलण्याच्या चर्चाही सुरुयेत. अशात ही स्मिता वाघ कशी लढत देणार, हे पाहावं लागणार आहे.
करण पवार यांना किती संधी?
खासदार उन्मेष पाटील यांचे मित्र करण पवार यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळालेली आहे. पारोळ्याचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत. पारोळ्यात भाजपाचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. मराठा असूनही ओबीसींमध्येही त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र भाजपाचा पारंपरिक मतदार ते आपल्याकडे कसा वळवणार, हे पाहावं लागणार आहे.
वंचितचे प्रफुल्ल लोढाही पूर्वाश्रमीचे भाजपाचेच
एकेकाळी गिरीश महाजन यांचे जवळचे अशी ओळख असलेल्या प्रफुल्ल लोढा यांनी भाजपाला रामराम करत वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे. कोराना काळात ते राष्ट्रवादीत गेले होते. त्यांचा किती प्रभाव या मतदारसंघात होईल हेही पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःअजित पवारांनी बहिणीला दिलेल्या शब्दाचं काय झालं, रोहित पवारांचा खोचक सवाल