X: @therajkaran
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सांगली (Sangli) येथे जनसंवाद सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल चढवला. ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अजित पवारांना पक्षाचे चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आली आहे. सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो, तशाच प्रकारे अजित पवारांना न्यायालय निकाल देत नाही तोवर तसेच लिहावे लागणार आहे. त्यामुळं भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झालीय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी या सभेत लगावला.
शिवसेनेने पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे. भाजपच्या बियांना अंकुर देखील फुटला नाही. जो माणूस मातीत खेळतो, तो मातीशी बेईमानी करत नाही. काही माणसं ओळखण्यात माझी चूक झाली. काय दिलं नव्हतं? खाऊन- खाऊन पचन झालं नाही, म्हणून पळून गेले. शिवसेना नसती तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची ओळख महाराष्ट्राला झाली असती का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी या सभेतून केला आहे.
उद्धव म्हणाले, आज या मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दम दिला आहे. तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आता निवडणुकीनंतर कुंडली आणि पोपट घेऊन झाडाखाली बसण्याचे काम आहे. ते पुढे म्हणाले, कोल्हापुरात जाऊन शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची भेट घेतली. तिथे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका करायचे, पण सुडाने वागले नाहीत,असंही ठाकरेंनी सांगितले.
आज औरंगजेबाची वृत्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडत आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा, आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सोडलं नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला या राज्यात मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही,” असा हल्लाबोल सांगलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी चढवला.