X : @NalavadeAnant
मुंबई: तुमच्या – आमच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, तरच आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत फायदा होणार आहे. अन्यथा महायुती फक्त कागदावरच आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते व माजी मंत्री विजय शिवतारे हे खालच्या पातळीवर टिका करत असून उमेश पाटील यांनी आज त्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घ्यावी असा सल्लाही पाटील यांनी दिला.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या महायुती सरकारकडून व मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडूनही फार अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना गालबोट लागेल, असे गंभीर वातावरण महायुतीतल्या कोणाही कार्यकर्त्यांनी आपल्या वक्तव्यातून निर्माण करू नये. मात्र ज्या प्रकारे विजय शिवतारे हे आमचे नेते अजित पवारांविरूद्धआक्षेपार्ह व गंभीर आरोप रोज करत आहेत, ही नक्कीच गंभीर बाब आहे. याची नोंद आपण घेतली पाहिजे आणि विजय शिवतारे यांचे तोंड ताबडतोब बंद केले पाहिजे. हे असेच चालूच राहिले तर निश्चितपणे राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, अजितदादांवर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांना या संपूर्ण महायुतीमधील निर्माण होणाऱ्या अडचणींना जबाबदार म्हणून मुख्यमंत्र्यांना धरावे लागेल असा स्पष्ट इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.