मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवरून (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरु आहे . या मतदासंघात उद्धव ठाकरेंनी( Uddhav Thackeray )चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी घोषित केली आहे .मात्र या जागेचा काँग्रेसकडून अजूनही आग्रह केला जात आहे. पण ही जागा शिवसेनेकडेच( उद्धव ठाकरे गट) राहणार असं दिसत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी या जागेवरून काँग्रेसशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे . त्यामुळे लवकरच या जागेचा तिढा सुटणार असल्याचे दिसून येत आहे .
सांगलीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये जागेवरील तिढा कायम असताना परस्पर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठली होती दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे दिल्लीतील चर्चेत ठरले असल्याचे कदम यांनी सांगितले .तसेच सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली , हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल,अशी मला खात्री असल्याचंही त्यांनी सांगितले .
या जागेवरून बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली . ते म्हणाले ,आमची जेव्हा भाजपसोबत युती होती किंवा असायची त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपामध्ये थोडी खेचाखच ही व्हायची. मात्र, एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर सगळे एकजिनसीपणाने काम करायचे. महाविकास आघाडीमध्येही बोलणी दोन-तीन महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा हे समजून घेतल्यासारखचं आहे. आम्ही जिंकण्याच्या ईर्षेने लढत आहे असे त्यांनी सांगितले .दरम्यान, शिवसेनेला मुंबई परिसरातही अधिक जागा हव्या आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने एक पाऊल मागे टाकले तर सेनेची सांगलीबाबत भूमिका बदलेल काय, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्यास बळ देत पश्चिम महाराष्ट्रात सेनेला स्थान देऊन सांगलीवरील सेनेची पकड सोडवून घेतली जाईल अशाही चर्चा सुरु आहेत .