नवी दिल्ली – इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वाधिक निधी भाजपाला मिळालय आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र या बाँडचे लाभार्थी हे इतर राजकीय पक्षही आहेत. हे खंडणीचं रॅकेट असल्याचा आरोप करणाऱ्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेला मिळालेल्या 509 कोटींचा निधी वादात सापडलाय. लॉटरी किंग सँटियागो मार्टिनच्या फ्यूचर गेमिंगकडून हे 509 कोटी मिळाल्याचं समोर आलंय. भाजपाला मिळालेल्या निवडणूक रोखे दानात याच फ्युचर गेमिंगचा मोठा वाटा आहे.यावरुन आता राजकारण रंगलंय. दुसरीकडं या इलेक्टोरल बाँड प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियानं कोणतीही माहिती लपवलेली नाही, असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. कोर्टाच्या आदेशानंतर बाँड देणाऱ्या देणगीदारांची आणि बाँड वठवणाऱ्या पक्षांची वेगवेगळी यादी एसबीआयनं दिलीय. त्यामुळं कोणत्या देणगीदारानं कोणत्या पक्षाला बाँड दिलेत हे स्पष्ट झालेलं नाहीये.
नव्या माहितीनंतर पुन्हा वाद आणि चर्चा
निवडणूक आयोगाने रविवारी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमधून 16 मार्च रोजी मिळालेल्या निवडणूक रोख्यांबाबतची नवी माहिती वेबसाइटवर अपलोड केली. नवीन डेटामध्ये 2017-18 या आर्थिक वर्षातील रोख्यांची माहिती समाविष्ट आहे. या आकडेवारीवरुन कोणत्या पक्षाला किती निधी मिळालाय हे स्पष्ट होतंय.
कोणत्या पक्षाला किती पैसे?
- भाजपने 6, 986 कोटी रुपयांचे बाँड वठवले
- 2019-20 साली भाजपाला सर्वाधिक 2 हजार 555 कोटी रुपये
- तृणमूल काँग्रेसला 1397 कोटी रुपयांचे बाँड
- काँग्रेसनं 1334 कोटी रुपयांचे बाँड वठवले.
- बीआरएसनं 1322 कोटी रुपयांचे बाँड वठवले.
- द्रमुकला निवडणूक रोख्यांद्वारे 656.5 कोटी रुपये मिळाले
इंडियातील घटक पक्ष डीएमकेही अडचणीत
या माहितीसोबतच इन्फ्रास्ट्रक्चर, गेमिंग, खाण कपन्यांनी हा निधी दिल्याचंही समोर आलंय. त्यानंतर यावरुन भाजपाला टार्गेट करण्यात येतंय. ईडीच्या माध्यमातून धाडी टाकून कंपन्यांवर दबाव टाकण्यात आला आणि त्यांना इलेक्टोरल बाँडची सक्ती करण्यात आली, असा आरोप काँग्रेस आणि मित्र पक्ष करताना दिसतायेत. इलेक्टोरल बाँड हे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असल्याचा आरोप राहुल गांधी आणि काँग्रेस नेते करतायेत. येत्या निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा महत्त्वाचा असेल असं स्पष्ट झालेलं आहे. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही हा भाजपाचा व्हाईट कॉलर भ्रष्टाचार असल्याची टीका केली होती. हे आरोप करणाऱ्या द्रमुकच्या एम के स्टॅलिन यांच्या द्रमुकलाही अशाच गेमिंग कंपन्यांकडून मोठा निधी मिळाल्याचं समोर आलंय.
डीएमकेचा 80 टक्के निधी फ्युचर गेमिंगचा
- डीएमकेला बाँडच्या माध्यमातून 656.5 कोटी
- यातील 80 टक्के निधी फ्यूचर गेमिंग कंपनीकडून
- फ्यूचर गेमिंग कंपनीने खरेदी केले 1368 कोटींचे बाँड
- फ्यूचर गेमिंग कंपनीचा 37 टक्के निधी डीएमकेला
गेमिंग कंपन्या, ऑनलाईन लॉटरी कंपन्यांकडून बाँड घेण्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपावर टीका केलीय. तर दुसरीकडं डीएमकेला मिळालेल्या फ्युचर गेमिंगच्या निधीवरुन भाजपानं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला घेरलंय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर ारोप प्रत्यारोप होताना दिसतायेत.
राज्याच्या राजकारणातही पडसाद
दुसरीकडं इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या कंपन्यांत नंबर दोनवर असलेल्या मेघा इंडिनिअरिंग कपंनीचं मुंबई कनेक्शन वादात सापडलंय. हैदराबादस्थित ‘मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड’ या कंपनीला गेल्या दोन वर्षांत मुंबई महापालिकेत दोन मोठी कंत्राटं मिळालीयेत.
मेघा इंजिनिअरिंगचं मुंबई कनेक्शन
- पश्चिम उपनगरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं कंत्राट
- दुसरे कंत्राट दहिसर वर्सोवा मार्गातील बोगद्याच्या कामाचं
- मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी ऑगस्ट 2022 मध्ये 6,000 कोटींची निविदा प्रक्रिया
- पाच कंत्राटदारांची निवड, जानेवारी 2023 मध्ये या कामांचे कार्यादेश
- पश्चिम उपनगरात 1631 कोटी रुपयांची कामं मेघा इंजिनिअरिंगला
- चारकोप ते माईंडस्पेस मालाडपर्यंत समांतर बोगद्यांच्या कामाचं दुसरं कंत्राट7. यातील एका टप्प्याचा खर्च सुमारे 2500 कोटी, दोन्ही दिशांचे बोगदे मिळून 5000 कोटींचं कंत्राट
- मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं खरेदी केलेत 966 कोटींचे इलेक्टोरल बाँड
मेघा इंजिनिअरिंग कंपनीला बोरिवली ते ठाणे बोगद्याचं 14 हजार कोटींचं कंत्राट देऊन, त्यांना 966 कोटींचे बाँड खरेदी करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप होतोय. भिवंडीतील वीज वितरणाचे कंत्राट असलेल्या टॉरेंट पॉवरने 185 कोटी रुपयांचे इलेक्शन बाँड खरेदी केलेत. या कंपनीला 2019साली राज्य सरकारनं 285 कोटी मालमत्ता करात माफ केल्याची चर्चा आहे. एकूणच घोटाळ्यांचा आणि या बाँडचा काही संबंध आहे का, अशी शंका सध्या देण्यात येतेय. या बाँड प्रकरणात नवनवीन माहिती दिवसेंदिस समोर येतेय. यातून निवडणुकांच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अधिकाधिक टीका होताना दिसेल.
हेही वाचाःराज ठाकरे महायुतीत आले तर कुणाला फायदा? मनसेच्या वाट्याला काय?